राजकारण

राजीनामा मागे घेण्यासाठी सिद्धूंच्या ३ अटी, पक्षश्रेष्ठीही आपल्या भूमिकेवर ठाम

चंदीगड: काँग्रेससाठी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या त्रासाचं सत्र काही संपताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नवीन मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, तर काँग्रेस पक्षश्रेष्ठी मात्र चरणजीत सिंह चन्नीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी स्वतः सिद्धूंशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अशा राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठीही कडक भूमिकेत आहेत. परिणामी, बुधवारी काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांचा चंदीगड दौरा रद्द केला. हरिश रावत सिद्धूंची समजूत काढण्यासाठी चंदीगडला जात होते. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने आपलं पूर्ण पाठबळ हे सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यामागे उभं केलं आहे. हेच नाही तर नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोधही काँग्रेसकडून घेतला जात आहे. यामध्ये कुलदीप नागरा, रवनीत सिंग बिट्टू हे सध्या पंजाब काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहेत.

कोणत्याही प्रकारची तडजोड करत नसल्याचं सांगत, सिद्धू यांनी राजीनामा तर दिला, मात्र बुधवारी एका मुलाखतीत त्यांनी नव्या सरकारमध्ये भ्रष्ट लोकांना स्थान दिल्याचं म्हटलं, यामध्ये मंत्र्यांपासून ते महाअधिवक्त्यांची त्यांनी नावं घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार, आता सिद्धूंनी काही अटी ठेवल्या आहेत, त्या मान्य झाल्या तरच ते राजीनामा मागे घेतील असं सांगण्यात आलं आहे. या अटींमध्ये राणा गुरजीत सिंह यांना मंत्रिमंडळातून हटवावं, डीजीपी प्रीत सिंह सहोटा यांनाही हटवावं अशा काही मागण्या आहेत. बादल सरकारच्या काळात गोळीबार प्रकरणाच्या चौकशी समितीचे नेतृत्व आयपीएस सहोटा यांनी केले होते. याशिवाय, महाधिवक्ता एपीएस देओल यांनाही पायउतार करण्याची अट ठेवण्याच आल्याची माहिती आहे. दरम्यान, आता नवज्योतसिंग सिद्धूंनी स्पष्ट सांगितलं आहे की, ते आपल्या अजेंड्यापासून मागे हटणार नाहीत.

दरम्यान या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे सौम्य भूमिका घेताना दिसत आहेत. नवज्योतसिंह सिद्धूंच्या प्रकरणावर ते बोलण टाळतात. शिवाय सिद्धूंना मनवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगतात. जेव्हा त्यांना सिद्धूंबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सिंद्धूंशी फोनवर बोलणं झालं असून लवकरच ते सिद्धू यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.

विशेष गोष्ट म्हणजे, पुढच्या वर्षीच पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे, त्यासाठी काँग्रेस ताकद लावत होती, पण अंतर्गत कलहामुळे तिचं पारडं हलकं होताना दिसत आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अकली दलाने मजबूत तयारी केली आहे. काँग्रेस इकडे घरची भांडणं सोडवत असताना, अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये प्रचार सुरुही केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button