एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा; भाजप प्रवक्त्याची राष्ट्रवादीवर टीका
मुंबई : उत्तर प्रदेशात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा देऊ केली होती. मात्र, आता ती जागा परत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशात आता शरद पवारांनी एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवावी, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातल्या एका जागेसाठी सपाच्या अखिलेश यादव यांच्यापुढे हात पसरूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी जागा दिल्यासारखे केले, काढून पण घेतली. आता शरद पवारांनी एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवावी, असे केशव उपाध्ये यांनी सांगत कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे?, असा सवाल ट्विटद्वारे केला आहे.
उत्तर प्रदेशातल्या एका जागेसाठी सपाच्या @yadavakhilesh पुढे हात पसरूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी जागा दिल्यासारख केल काढून पण घेतली. आता @PawarSpeaks एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा. कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 18, 2022
दरम्यान, महाराष्ट्रातल्या पक्षांनी उत्तर प्रदेशात युतीचा निर्णय घेतल आहे. त्यासंदर्भात, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांबाबत खुलासा केला होता. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार आहेत. आम्ही सर्व नेते उत्तर प्रदेशात जाणार आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात जाणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा केली तरी शेवटी राजकारण करायला त्यांना गल्लीतच यावे लागते. पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही, अशी बोचरी टीका भाजपाचे गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरूनही केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.