मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका फोटोनं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. त्याचाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोमय्यांच्या या कृतीवर काँग्रेसनं आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोमय्या यांना फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्यात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईली तपासतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोमय्यांच्या या कृतीबाबत काँग्रेसनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचं बोललं जात आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या दालनात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल पाहतानाचा सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होतो. तर सोमय्या यांनी झालेला प्रकार नियमबाह्य नसल्याचा दावा केला होता.
आघाडी सरकारला कशाची भीती वाटतेय?
दरम्यान, सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी १३ गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे. दिल्लीत सोमय्या यांनी हे विधान केलं. मात्र, सोमय्या यांनी नेमक्या कोणत्या फायली चेक केल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आघाडी सरकारला भीती कसली आहे? कोणत्या कोणत्या फायली तपासल्या त्याची का? वायकरांची फाईल होती की सरनाईकांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटतं बहुतेक भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळत असते. वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते. घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती मिळत असते. मी कुठेही जाणार, जातो. माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो, असं किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्यांना दिलेल्या नोटीसीवरुन फडणवीस संतप्त
सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. नगरविकास खात्याकडून सोमय्या यांनाही एक नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसीवरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्या बोलवित्या धन्यावर कारवाई करा! मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार?’ असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?, असा खोचक सवालही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.