भाजपचं ओळखपत्रं दाखवा, पेट्रोल मोफत मिळवा; शिवसेनेच्या वर्धापनदिनी खास ऑफर
मुंबई / सिंधुदुर्ग : शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे.
त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी २ लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन)
आणि
भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल मोफत वाटप करण्यात येणार आहे. pic.twitter.com/3F8dZKkz5C
— Vaibhav Naik (@VaibhavNaikMLA) June 18, 2021
उद्धव ठाकरेंचा आज शिवसैनिकांशी संवाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.