शिवसेना गुंडगिरी करते, पण सत्तेचा माज नाही : संजय राऊत
मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर काढलेल्या मोर्चावेळी मोठा राडा झाला. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह ७ शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल झालाय. त्याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. शिवसेना गुंडगिरी करते. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकप्रकारे सज्जड दम भरलाय.
शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असे राऊत म्हणाले.
ही गुंडगिरी मराठी माणसाने त्यावेळी केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं संत तुकाराम महाराज म्हणालेत. ती गुंडगिरी आम्ही केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईमध्ये आजही मराठी माणसाचा आवाज आहे. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर मराठी माणसाला गुंडगिरी करावीच लागेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी पक्षाला आंदोलनाचा अधिकार आहे. उलट विरोधी पक्षाचा आवाज बुलंद असला पाहिजे या मताचा मी आणि मुख्यमंत्री महोदयही आहेत. पण आंदोलन करत असताना आमची जी श्रद्धास्थानं आहेत, आमच्या अस्मितेच्या ज्या खुणा आहेत, त्याकडे वाकड्या नजरेनं पहाल तर ते सहन होणार नाही, महाराष्ट्र खवळून उठेल. काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी जरी असला तरी त्याशिवाय पर्याय नव्हता.
शिवसेना भवनासमोर आंदोलन करायचंच नाही का? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी राऊत यांना विचारला तेव्हा नाही करायचं असं थेट उत्तर त्यांनी दिलंय. शिवसेना भवन हे अपवाद आहे महाराष्ट्रात आणि देशात. शिवसेना भवन ही अशी वास्तू आहे जिच्या समोरुन जाताना प्रत्येकाची मान बाळासाहेबांकडे पाहून विनम्रपणे खाली झुकते. तुम्ही तिथे आंदोलन करु नका, आंदोलनासाठी वेगळ्या जागा खूप आहेत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. त्याचबरोबर काल महिलांवर कुठेही हल्ला झालेला नाही. मला असं दिसलं की महिला पुढे पुढे जात आहे. महिलांनी अशावेळी थोडं लांब थांबलं पाहिजे. पुरुषांच्या अंगावर जाणं बरोबर नाही. मी ते पाहिलं आहे, असंही राऊत म्हणाले.