Top Newsराजकारण

गोव्यातील घडामोडी : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; बाबूश मोन्सेरात दाम्पत्यावर खटला सुरू

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने आज ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना शिवसेना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढणार आहे. त्यापैकी शिवसेनेने आज ९ जागांवरील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. तसेच उद्यापर्यंत तीन जागांची घोषणा करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. आज ९ जागांची यादी जाहीर करत आहोत. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार

पेडणे- सुभाष केरकर, मापसा- जितेश कामत, शिवली- भीमसेन परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, पणजी – शैलेंद्र वेलिंगकर, पर्ये- गुरुदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर, केपे- अ‍ॅलेक्सी फर्नांडिस

शैलेंद्र वेलिंगकर यांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आरएसएसचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर गोव्यातील उपराज्य प्रमुख पदाची जबाबदारी देत देण्यात येत असल्याची घोषणा राऊत यांनी केली. शैलेंद्र आल्याने गोव्यातील संघटनेचा विस्तार आणि व्याप्ती वाढेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

गोव्याचं राजकारण आशादायी नाही

गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा काही नवीन पक्ष नाही. निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. 2017मध्ये आम्ही निवडणूक लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण आणि वातावरण आशादायी नाही. वातावरण गढूळ झालं आहे. अनेक पक्ष नव्याने उतरले आहेत. उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. कोण कुणाकडून लढत आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही. हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित आहे. गोव्यात मात्र आलेमाव गेलेमाव हा शब्द रुढ झाला. कधी कोण आले कधी कोण बंड करेल हे सांगता येत नाही. तरीही शिवसेना लढत आहे. गोव्यातील राजकारण पाच ते दहा लोकांच्या हातात आहे, असं राऊत म्हणाले.

बाबूश मोन्सेरात दाम्पत्याला उमेदवारी जाहीर अन् खटलाही सुरू

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपले ३४ उमेदवार जाहीर केल्यानंतर रुसवे फुगवे उफाळून आले आहेत. उमेदवारी मिळालेले खूश झाले; परंतु आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळूनही आनंद साजरा करण्याची स्थिती राहिली नाही, उत्पल पर्रिकर यांच्या बंडखोरीमुळे नव्हे, तर सीबीआय न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या खटल्यामुळे.

पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरण इतिहास जमा झाले असले तरी त्या प्रकरणात बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि इतरांविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आणि त्यानंतरचे खटले त्यांची पाठ सोडत नाहीत. आरोपपत्र दाखल करण्यात आल्यांतरही हे आरोपपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी उभयतांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात केली होती. त्यांना अंतरिम दिलासा देताना खंडपीठाने काही काळासाठी सुनावणी स्थगित केली होती. परंतु हा अंतरिम दिलासाच त्यांना अधिक महागात पडला. कारण त्यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला आणि त्यांच्यावर खटला चालविण्याचा आदेश दिला. हा खटला बरोबर निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झाला. शुक्रवारी मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध म्हापसा येथील सीबीआय न्यायालयात सुरू होत आहे. महत्त्वाचे म्हणजे बाबूश आणि जेनिफर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

२००८ सालच्या या गुन्ह्यासाठी मोन्सेरात दाम्पत्यासह इतर ३५ जणांविरुद्धही खटला चालणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस ठाण्यावर हल्ला झाला त्यावेळी मोन्सेरात हे काँग्रेसमध्ये होते आणि आज त्यांच्यावर खटला सुरू होत आहे तेव्हा ते भाजपत आहेत. मोन्सेरात यांच्याबरोबरच त्यांचे त्यावेळचे सहकारी माजी महापौर उदय मडकईकर आणि टोनी रॉड्रिगीश हेही त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्याविरुद्धही खटला चालणार आहे. परंतु, आज ते दोघेही ते काँग्रेसमध्ये दाखल होऊन मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल; प्रतापसिंह राणेंचे प्रत्युत्तर

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी करणारी, चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. ‘फडणवीस तेव्हा मला भेटले होते, ही खरी गोष्ट आहे. परंतु, या भेटीत राजकीय स्वरूपाची चर्चा झाली नाही. पर्ये मतदारसंघ काढून दुसऱ्याला देण्यासाठी मतदारसंघ माझी खासगी मालमत्ता नाही, असे राणे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंग राणे यांच्याविषयी भाजपचे केंद्रीय नेते अपप्रचार करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केला आहे. दिव्या राणे यांना उमेदवारी देताना भाजपने प्रतापसिंग राणे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी दिली. प्रतापसिंग राणेंचा त्यासाठी आशीर्वाद आहे, असे फडवणीस यांनी म्हटले होते. कार्यकर्ते चलबिचल करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button