Top Newsराजकारण

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे संघर्षाची नांदी

राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही : विनायक राऊत

कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन करणार असल्याचे समजते. यावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून, नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेना खा. विनायक राऊतांनी केली आहे.

दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका केली आहे. स्मृती स्थळाला भेट देण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

नारायण राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. नारायण राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचे पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राऊतांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या एन्ट्रीने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button