राजकारण

देशात फक्त पश्चिम बंगाल, महाराष्ट्राचेच राज्यपाल काम करतात; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई: देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करत आहेत, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना फक्त दोन मिनिटं लागतील. मात्र, सध्या भगतसिंह कोश्यारी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे खूपच काम करत आहेत, अशी टिप्पणी राऊत यांनी केली.

मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उच्च न्यायालयाने राज्यपालांना विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली होती. याविषयी राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हायकोर्टाने जे राज्यपालांना विचारले ते आम्ही सरकार म्हणून कितीतरी दिवसांपासून विचारत आहोत. मात्र, राज्यपाल त्या फाईलवर बसले आहेत. हा सरकारचा अपमान आहे. विधान परिषदेवर राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणं हे घटनाविरोधी आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झालेल्या कोकणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत जास्तीत जास्त मदत जाहीर करतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे १२ नावे पाठवली आहे. यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.

न्या. काथावाला आणि तावडे यांच्या खंडपीठापुढं यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केलीय. वकील गौरव श्रीवास्तव त्यांची बाजू मांडतायत. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी १२ आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद श्रीवास्तव यांनी केला. इतर राज्यांमध्ये एका दिवसात निर्णय झाल्याची उदाहरणं त्यांनी कोर्टाला दाखवून दिली. घटनादत्त अधिकारांचं वहन करण्यात राज्यपाल अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button