नंदूरबार: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे.
राऊत आज नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं सांगतानाच शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.
यावेळी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला गेले होते. या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीवर राजकारण करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत आता राज्याची भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रसने आता सामान्य जनतेत पक्ष संघटन मजबूत करावे, असं मी म्हटलं होतं. शेवटी विरोधी पक्ष हा मजबूत आणि सक्षम असावा लागतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.