मुंबई : ‘पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नाही. विशेष अधिवेशन कशासाठी? असं काय घडलं आहे महाराष्ट्रात? राज्यपाल हे राज्याचे पालक आहेत. त्यांनी राज्याची बदनामी करु नये. घटनात्मक पदावर ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते या राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. राज्याची बदनामी होत असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजेत, पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत’, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला.
साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा पत्रसंघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलावलं होतं. त्याला उत्तर देताना संसदेचं ४ दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलीय. या पत्रसंघर्षानंतर आता राज्यातील भाजप आणि शिवसेनेचे नेते आमनेसामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
‘राजभवनात जाऊन सरकारविरोधी जे काही सुरु आहे, त्यामुळे आम्हाला एक दिवस पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांकडे जाऊन आम्हाला भूमिका मांडवी लागेल. तुमच्या इतर राज्यात काही घडत नाही का? सगळं आलबेल आहे का ? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आकडे दिले आहेत. कुठल्या राज्यात काय सुरु आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कागदपत्र आहेत आणि तो दस्तावेज आता राजभवनाच्या रेकॉर्डला कायमस्वरुपी राहील. राज्यपालांनी आ बैल मुझे मार असं केलं आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची होती. आम्ही मूठ उघडली आहे. अजून उघडायला लावू नका’, असा इशाराच राऊतांनी यावेळी दिलाय.
ठाकरेंनी नीतीची तरी साथ सोडू नये : मुनगंटीवार
राज्यपालांनी अधिवेशन घ्या असा सल्ला दिल्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे असंगाशी संग आहे. राज्यपालांची सूचना शिरोधार्ह मानून त्यावर अंमल करत देशाला मार्ग दाखविण्याची ही वेळ होती. साकीनाका संदर्भात आपण केलेल्या उपाययोजना पाहून, मग देशाला उत्तम काम दाखवून संसदेचे अधिवेशन घ्या, अशी भूमिका मांडता आली असती. साकीनाका प्रकरणी असंवेदनशीलतेनं दुसरीकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, त्यांनी आता नीतीची तरी साथ सोडू नये, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केलीय.