मुंबई: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पक्षात समाधानी आहे. राणेंनी जे सांगितलं त्यात तथ्य नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो. मातोश्री काय आणि उद्धव साहेब काय कोणीही माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असं शिंदे म्हणाले.
राणेंनाही मोदींना विचारावच लागेल
राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारवंच लागतं. माझंच खातं नाही, कोणतंही खातं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामुहिक निर्णय घेत असतं. हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारूनच घ्यावा लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. कालचं विधान हा त्याचाच एक भाग आहे, असं ते म्हणाले. कोव्हिडच्या काळात आम्ही विकासाची अनेक कामे केली. अनेक निर्णय घेतले. विकासही सुरू ठेवला आणि कोरोनाची परिस्थितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या खात्याने अनेक कामे केली. मला स्वातंत्र्य नसते तर मी ही कामं करू शकलो असतो काय?, असा सवालही त्यांनी केला.
राणेंना ठोकम ठोकीची सवयच : खा. विनायक राऊत
राणेंच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही समाचार घेतला आहे. राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपने नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे. बाडगा जो असतो तो कोडगा असतो असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत यांनी माध्यमांशी साधताना नारायण राणेंच्या विधानाचा समाचार घेतला. स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबूत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली.
शिंदे शिवसेनेसाठी अभिमान
राणेंना ठोकम ठोकी करायची सवयच आहे. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं. जिल्हा नियोजनाची बैठक दहा दिवस आगोदर जाहीर केली आहे. नारायण राणेंना काटशह देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. तसेच कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवरही टीका केली. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.