शिवाजीराव पाटील-निलंगेकर अर्बन बँकेचा परवाना रद्द
आरबीआयची कारवाई; ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) महाराष्ट्रातील डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई बँकेच्या बिकट वित्तिय परिस्थितीमुळे करण्यात आली आहे. परवाना रद्द करण्याबरोबरच बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत.
बँकेचा परवानाच रद्द झाल्याने आता बँक ठेवीदारांना पैसे देण्यास असमर्थ होईल. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.
आरबीआयने अशी माहिती दिली आहे की सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. हे बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदीनुसार नाही. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ग्राहकांसाठी सुरू राहणं योग्य नाही. बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होईल.