शिवसेनेची औरंगजेबी वृत्ती दिसली; आशिष शेलारांचा घणाघात
...तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा
मुंबई : भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केलं होतं. मात्र शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यावरुन शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात. त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशी घणाघाती टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलीय. लाथों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने पुकारलेल्या फटकार मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केलीय. या मागणीसाठी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष माहिम पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन अजून वाढेल, असा इशारा देतानाच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन असं आश्वासित केल्याचं यावेळी आशिष शेलार यांनी सांगितलं. पण आम्हाला अजूनही कारण कळत नाही की राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे. ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.
…तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची शिवसेना भवनासमोर जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. त्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल, असे थे म्हणाले.