मुंबई : गोव्यात भाजपचे मंत्री आणि आमदाराने भाजप सोडला म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. उत्तर प्रदेशात देखील अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचाच अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आलाय. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपनं सावध राहावं, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. लाटांचे तडाखे बसायला सुरूवात झाली आहे. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० जागा लढवेल. मी उद्या दिल्लीत व परवा उत्तर प्रदेशात जात आहे. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन निश्चित आहे, असं संजय राऊत म्हणाले.
उत्तर प्रदेशात भाजपला एकामागोमाग एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या आणखी तीन आमदारांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकंच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेदत उत्तर प्रदेशात भाजपचे १२ आमदार समाजवादी पक्षात दाखल होण्याची शक्यता असल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे.
गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणूगोपाळ यांच्याशी चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात परिवरर्तन घडवू शकतो. सेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणं चांगलं आहे. गोव्यात तृणमुलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाचवेळी चर्चा नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, जर काँग्रेसची इच्छा नसेल तर मग स्वबळावर लढू, असंही संजय राऊत म्हणाले.