मुंबई: शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाही केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे, तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता अपेक्षेप्रमाणे कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.
अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनील शिंदे हे २००७ मध्ये मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. २०१४ मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत ६० हजार ६२५ मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना ३७ हजार ६१३ मतं मिळाली होती. २०१५ मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्याग केल्यामुळेच शिंदेंना उमेदवारी : संजय राऊत
सुनील शिंदे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आली. बाबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुनील शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं आहे. सुनील शिंदे हे वरळीचे आमदार होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी जागा सोडली. हा त्यांचा त्याग आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या त्यागाचं आणि निष्ठेचं स्मरण ठेवून त्यांना उमेदवारी दिली, असं त्यांनी सांगितलं.
ऑडिओ क्लिपवर मौन
मात्र, राऊत यांनी कदम यांच्या ऑडिओ क्लिपबाबत बोलण्यास नकार दिला. मी ऑडिओ क्लिपवर बोलणार नाही. कदम यांनी पक्षासाठी काम केलं आहे. अनेक वर्ष आमदार, मंत्री होते. विधानपरिषदेत त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. आम्ही सोबत काम करू. मी काही मार्गदर्शक नाही. आम्ही सर्व नेते आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.