कोल्हापूर: कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोर आली आल्यानंतर आता कोल्हापुरात नव्या वादाला तोंड फुटल आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओमध्ये उभा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकिची कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षांपूर्वी विक्री केल्याचे उघड झाले आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ फेब्रुवारी २०२० रोजी ६ कोटी ५० लाखाचा व्यवहार या जागेचा झाला आहे.
महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या फार्मने ही जागा खरेदी केली आहे. विशेष म्हणजे याच्या भागीदारांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रुतुराज आणि पुष्कराज या दोन्ही मुलांची नाव आहेत. हेरिटेज वास्तूंमध्ये समावेश असलेल्या जयप्रभा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी प्रसंगी लता मंगेशकर यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. कोल्हापूरकरांनी हातात पायताण घेऊन केलेल्या आंदोलनामुळे लतादीदी कायमच्या कोल्हापूरपासून दुरावल्या होत्या. याच जयाप्रभा स्टुडिओबाबत न्यायालयातही लढाई सुरू असतानाच जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याचे समोर आल्याने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे.
जयप्रभा स्टुडिओची विक्री म्हणजे कोल्हापूरवर दरोडा असून हेरिटेजमधील वास्तू विकली गेलीच कशी असा सवाल आता नगरसेवक भूपाल शेटे यांनी उपस्थित केला आहे. याबाबतीत लवकरच जनहित याचिका देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत.
जयप्रभा स्टुडिओचा इतिहास
कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती व्हावी यासाठी राजाराम महाराजांनी १९३४ मध्ये त्याकाळी शहरापासून बाहेर असलेली १३ एकर जागा भालजी पेंढारकर यांना दिली. भालजी पेंढारकर यांनीही चित्रपट निर्मितीसाठी या जागेचा वापर करत त्या ठिकाणी अनेक यशस्वी चित्रपट केले. मात्र काही काळानंतर भालजी पेंढारकर कर्जबाजारी झाले आणि त्यांनी ही जागा लता मंगेशकर यांना दिली. लता मंगेशकर यांनीही भालजी पेंढारकर जिवंत असेपर्यंत याचा कला क्षेत्रासाठी वापर केला. त्यानंतर मात्र यातील काही जागेवर मोठ्या इमारती उभे राहू लागल्या. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा असलेली शहर परिसरातील जागाही धोक्यात आली.
जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज म्हणून जतन करावा यासाठी कोल्हापुरात मोठा लढा उभा राहिला होता. त्यावेळी कोल्हापूरकरांनी लतादीदींविरोधात पायताण आंदोलन पुकारले होते. जयप्रभा स्टुडिओ वाचवा म्हणून आंदोलन आणि न्यायालयीन लढा दिला गेला होता, हे सगळं सुरु असतानाच मात्र ही जागा विकली गेल्याचे समोर आल्यानं कोल्हापूरकरांमधून आता संताप व्यक्त होत आहे.
जयप्रभा स्टुडिओ जागा विक्री प्रकरणाला आता राजकीय रंगदेखील मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या कंपनीने ही जागा खरेदी केली आहे त्या कंपनीत भागीदार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ऋतुराज आणि पुष्कराज या दोन्ही मुलांचा समावेश आहे. जयप्रभा स्टुडिओच्या आंदोलनात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहभाग घेतला होता आता त्यांच्याच मुलांनी ही जागा खरेदी केल्याने कलाप्रेमी कोल्हापूर कलाकारांना हे धक्कादायक आहे.
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र याबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय. मुलांनी केलेल्या व्यवहाराची आपल्याला माहिती नाही. एखादी जागा कायदेशीरपणे विकत घेण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे याचा समर्थनच केले. तर आपल्याला कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांनी थेट पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच निशाणा साधला आहे..
एकूणच जयप्रभा स्टुडिओची वादातील जागा विकली गेल्या समोर होता कलाप्रेमी मध्ये संतापाची लाट दिसते तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा यातील सहभाग आम्ही आता याला राजकीय रंग देखील येताना दिसतोय… त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ वरून कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापणार हे निश्चित.