Top Newsस्पोर्ट्स

शार्दूल ठाकूरमुळे खेळाला कलाटणी; भारताचा वेस्ट इंडिजला ‘व्हाईट वॉश’

आयसीसी टी -२० रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानी

कोलकाता : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या तीन षटकांत माघारी परतले. पण, त्यानंतर विंडीजने संघर्ष दाखवताना सामन्यातील आव्हान कायम राखले होते. निकोलस पूरन, रोवमन पॉवेल यांनी पुन्हा एकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्दूल ठाकूरने मोक्याच्या क्षणाला निकोलसची विकेट घेत सामना फिरवला अन् वेस्ट इंडिजचा आणखी एक पराभव झाला. सूर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका ३-० अशी खिशात घालताना आयसीसी टी -२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

वेस्ट इंडिजला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने पाचव्या चेंडूवर कायल मेयर्सला (६) बाद केले. मैदानावरील अम्पायरने कॅचची अपील नाकारल्यानंतर रोहितने त्वरित डीआरएस घेतला आणि तो यशस्वी ठरला. त्यानंतर पुढच्या षटकातच चहरने विंडीजचा दुसरा सलामीवीर शे होप्स (८) याचीही विकेट घेतली. भारतीय संघाने पुनरागमन केलेले असताना प्रमुख गोलंदाज दीपक चहर याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. निकोलस पूरन व रोवमन पॉवेल ही डोईजड झालेली जोडी हर्षल पटेलनं तोडली. या जोडीनं २५ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने अफलातून झेल घेताना पॉवेलला २५ धावांवर (१४ चेंडू) चालते केले. किरॉन पोलार्ड या मालिकेतच अपयशी ठरला आणि आजही तो केवळ ५ धावांवर बाद झाला. जेसन होल्डरही (२) लगेच बाद झाला आणि पोलार्ड व होल्डर यांची विकेट वेंकटेश अय्यरने घेतली.

अय्यरच्या धक्क्यानंतर हर्षल पटेलने आयपीएलमधील अनुभव कामी आणला आणि रोस्टन चेसला स्लोव्हर यॉर्करवर त्रिफळाचीत केले. विंडीजची अवस्था ६ बाद १०० अशी झाली होती. निकोलस ३७ धावांवर असताना रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक इशान किशनने झेल सोडला. पूरन व रोमारियो शेफर्ड ही जोडी फटकेबाजी करताना दिसली. पूरनने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक पूर्ण करताना विंडीजच्या विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता. चहरसारखा अनुभवी गोलंदाज मैदानाबाहेर गेल्याचा भारताला फटका बसताना दिसला. पदार्पणवीर आवेश खानच्या ४ षटकांत ४२ धावा आल्या.

विजयासाठी १८ चेंडूंत ३७ धावांची गरज असताना शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणण्याचा रोहितचा प्लान यशस्वी ठरला. शार्दूलच्या संथ गतीने टाकलेल्या चेंडूवर निकोलस फसला अन् इशान किशनने अफलातून झेल टिपला. निकोलस ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावांवर माघारी परतला. शार्दूलने १८ व्या षटकात ६ धावा देताना महत्त्वाची विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. हर्षलने १९व्या षटकात शेफर्डला २९ धावांवर बाद करून भारताचा विजय पक्का केला. हर्षलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडला ( ४) आलेल्या अपयशानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण, रोहितही अपयशी ठरला. अय्यर २५ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात रोस्टन चेसने भारताला आणखी एक धक्का दिला. इशान ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित ७ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.

सूर्यकुमार यादवची फटकेबाजी

या सामन्यात सूर्यकुमार यादवने करिष्मा केला. ३ बाद ६६ अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियासाठी तो संकटमोचक म्हणून धावला अन् वेंकटेश अय्यरसह विंडीजच्या गोलंदाजांना चोपून काढला. त्याने आज अनेक विक्रमही मोडले.

सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली. त्यांनी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्या विंडीजसमोर तगडे आव्हान उभे केले. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत खेळलेल्या चारही ट्वेंटी-२० मालिकेत किमान एक ५०+ खेळी केली आहे. त्याने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५७, श्रीलंकेविरुद्ध ५०, न्यूझीलंडविरुद्ध ६२ आणि आज वेस्ट इंडिजविरुद्ध ६५ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या १२ डावांत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांत सूर्यकुमारने ३५१ धावांसह अजिंक्य रहाणेला (२६९) मागे टाकले. लोकेश राहुल (४७६), विराट कोहली (३८३) , गौतम गंभीर (३७८) व युवराज सिंग (३५१) हे आघाडीवर आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पाचव्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी आज सूर्यकुमार व वेंकटेश यांनी ( ९१ धावा) नोंदवली. २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंग यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२* आणि २०१८मध्ये धोनी व मनीष पांडे यांनी दक्षिण आफ्रिकेविरुरद्ध ९८* धावांची भागीदारी केली होती.

पहिल्या ५ चेंडूत २ डीआरएस, दोन्ही सक्सेसफुल !

दरम्यान, १८५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विंडीजने विकेट गमावली आहे. या पहिल्या षटकातील सुरुवातीच्या ५ चेंडूत दोन वेळा डीआरएस (Decision Review System) पाहायला मिळाला. षटकातील तिसरा चेंडू काईल मेअर्सच्या पॅडवर जाऊन आदळला. पंचांनी बोट वर करुन मेअर्सला बाद घोषित केला. मात्र मेअर्सने डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर पाचवा चेंडू काईल मेअर्सच्या बॅटला लागून यष्टीरक्षक इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. मात्र पंचांनी नकारार्थी मान डोलावली. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक आणि दीपक चाहर तिघांनाही विश्वास होता की, चेंडू बॅटला लागला आहे. त्यामुळे रोहितने क्षणाचाही विलंब न करता डीआरएस घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंचांना आपला निर्णय मागे घ्यायला लावत मेअर्सला बाद घोषित करण्यास सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button