मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार विजयी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झाला आहे. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केलं. त्यात २९ मतं शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना २ मतं मिळाली आहे. दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, प्रतीप कर्णिक, प्रभाकर नारकर, अमला नेवाळकर यांचा विजय झाला आहे. तर संतोष कदम, रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे आणि सुधीर सावंत यांचा पराभव झाला आहे.
निवडणूक पार पडल्यानंतर धनंजय शिंदे यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गानं झाली नसल्याचा आरोप केलाय. आम्ही याबाबत आमचं मत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मांडलं. तरीही निवडणूक घेतली. आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं ते म्हणाले. तर दुसरीकडे निवडणूक लोकशाही मार्गानेच झाल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी केलाय. न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
तर ही निवडणूक लोकशाही मार्गाने आणि घटनेप्रमाणेच झाली आहे. साहित्य आणि वाचक प्रेमींसाठी ही संस्था काम करते. यात राजकारण हा विषय नाही. आप पक्षाला महापालिका निवडणुकीत फायदा व्हावा या हेतूनं त्यांनी ही निवडणूक लढवली, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिलीय.
सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार : शिंदे
तत्पूर्वी ही निवडणूक एकप्रकारे राजकीय आखाडा बनली होती. त्यावरुन ही साखर कारखान्याची, बँकेची निवडणूक नाही. सरस्वतीच्या संस्थेत गैरकारभार सुरु आहे. ही दंडेशलाही आहे. या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं धनंजय शिंदे म्हणाले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि उमेदवार विद्या चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहेत. पवारांवर आरोप केले की प्रसिद्धी मिळते हे काही जणांना माहीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बाबत करण्यात आलेल्या आरोपाला उत्तर दिले जाईल, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.