मुंबई : ऐन थंडीच्या दिवसात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाहटेच्या शपथविधीवरून पुन्हा राजकारणाचे निखारे पेटले आहेत. शरद पवारांनी आजपर्यंत त्यावर खुली प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र शरद पवार बोलले आणि दुसरीकडून भाजप नेतेही बोलते झाले. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काही तिखट सवाल विचारत पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा आहे, अशी टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडल्या याबाबत एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली. तसेच या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी विचारलं होतं, असंदेखील पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं असे भाष्य शरद पवार यांनी केले. तसेच अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का? हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
शरद पवार कधी काय करतील याचा अंदाज एवढ्या वर्षात राजकारण्यांनाच काय राज्यातल्या जनतेलाही लागला नाही, त्यामुळे पवारांनी आत्ता टाकलेल्या गुगलीमागील कारण काय? हे येणारा काळच सांगेल, मात्र सध्या तरी यावरून ऐन थंडीच्या दिवसात राजकारण तापलंय.