सोलापूर/पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. दरम्यान, सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभागाचं सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात मी बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाचा कोणत्याही कंपनीवर छापा टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे. काय अयोग्य आहे, कॅश सापडतात का तेही ते करतात. ते चौकशी करुन जातील. मग मी यावर भाष्य करेन, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या छाप्यांवर बोलताना शरद पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिसीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.
लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजप नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला. सत्ता लोकहितासाठी राबवायची असते. पण भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशातील जनता हे सगळं पाहतेय. ही जनताच भाजपाला धडा शिकवेल, असं पवार म्हणाले. रेल्वे, विमानतळ, वाहतूक व्यवस्थेचं खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारनं घातलाय; स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पायाभूत सुविधा उभारल्या; पण मोदी सरकारला रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्यात अधिक रस असल्याची टीका त्यांनी केली.
केंद्राकडून राज्याला रोजचा त्रास
महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे. कुणीही काही म्हटले तरी सामंजस्यपणाने सरकार चालविले जात आहे. दिल्लीवरुन या सरकारला रोज त्रास दिला जात आहे. अनेक गोष्टींवरुन त्रास दिला जातो. केंद्र सरकार इकडचा कर गोळा करते, मात्र राज्याचा वाटा केंद्र सरकार देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असं केलं जात आहे, असं शरद पवार म्हणाले.
म्हणून गुजरातला निधी दिला
मी मंत्री असताना गुजरातला निधी देऊ नका असं मला सांगितलं जात होतं. पण मी मात्र देश चालवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे संकुचितपणा न ठेवता मदत केली. मी गुजरातमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आहे हे पाहिले नाही. तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं.
वाढत्या महागाईला भाजपच जबाबदार
यावेळी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. तरीही इकडे किंमती रोज वाढताना दिसत आहेत. या महागाईला भाजप सरकार जबाबदार आहे. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात महाराष्ट्र कुठे आहे असं लोक विचारतात. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची बैठक झाली. त्यात ११ तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी व्हा. एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये. कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असं ते म्हणाले.
सामाजिक बांधिलकी सोडणार नाही
लखीमपूर येथे झालेल्या हिंसेवरही त्यांनी पुन्हा भाष्य केलं. मी लखीमपूर हिंसेचा जालियनवाला बागेशी संबंध जोडला. हा उल्लेख सत्ताधाऱ्यांना रुजला नाही. एका सत्ताधारी नेत्याने मला सांगितलं. त्यामुळे छापेमारी करण्यात आली. पण तुम्ही छापा मारा, काही करा. पण मी सामाजिक बांधिलकी सोडणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.
आयकर विभागाचे छापासत्र दुसऱ्या दिवशीही सुरूच
अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. जवळपास ३० तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे.
दरम्यान, पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी सगळं बोलेन. मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही. कर कसा चुकवता येणार नाही, याची मी अधिकाऱ्यांशी बोलत असतो. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांसहित सर्व कंपन्यांनी कर भरला पाहिजे या मताचा मी आहे. आर्थिक शिस्त कोणी मोडू नये, असे अजित पवार म्हणाले.
दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही : सुप्रिया सुळे
आयकर विभागाने ज्यांच्यावर छापे टाकले ते नुसते दादांचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून पवार कुटुंबीयांना संघर्ष नवीन नसल्याचे त्या म्हणाल्या.