राजकारण

शरद पवार शिवसेनेला संपवायला निघालेत : चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना सावधानतेचा इशारा; अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

सांगली : भाजपाने आज देशमुख यांच्या पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहेत, असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेवर दबाव आणून हे निर्णय घ्यायला भाग पाडले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहे. आरोपांचं पत्र समोर आल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सांगलीत आंदोलनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,मी दोन तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. ते माहितीच्या आधारेच सांगितलं होतं की, दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्याप्रमाणे अनिल देशमुखांचा राजीनामा आज घेतला पाहिजे. नीतिमत्तेची चाड असेल, तर उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा घेतील. उद्धवजींना माझं आवाहन आहे की, आमचा विषय नाहीये. शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. जर संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जात आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येकवेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करतेय की, सरकारची प्रतिमा बिघडतेय राठोडांचा राजीनामा घ्या. मग मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात नाही का? त्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ देशमुखच नाही तर शिवसेनेचे मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. ते मंत्री कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे मी दोन मंत्री म्हणालो होतो, दुसरे ते आहेत, असं पाटील म्हणाले.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत. ते अतिशय निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट झालं आहे की, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे, हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या 52 ते 56 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले आहेत. मग ते अनिल देशमुख यांना पाठिशी का घालत आहेत? मात्र, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, तसेच त्यांची चौकशीही झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही याचा साक्षात्कार गृहमंत्र्यांना इतक्या दिवसानंतर झाला का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर मी कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो होतो, हे त्यांनी मान्य करावे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रपती राजवटीची मागणी केली तर ती पूर्ण करुनच राहू
यावेळी प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना भाजप राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करु तेव्हा ती पूर्ण करुनच राहू, असे वक्तव्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button