शरद पवारांना रुग्णालयातून सुट्टी; सक्तीच्या आरामाचा सल्ला
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अखेर चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते. शरद पवार यांची आज ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली
शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यांना आराम वाटू लागल्याने आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी आणि कन्येसह ते सिल्व्हर ओकला पोहोचले आहेत. डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३० मार्चला शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार साहेबांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्यांचे सर्व आरोग्याचे मापदंड स्थिर राहिले तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांती आवश्यक असल्याने त्यांनी शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये, आपल्या सर्व सहकार्याबद्दल आणि पवार साहेबांना शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
पुन्हा शस्त्रक्रिया होणार
15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.