खतांची दरवाढ मागे घ्या; शरद पवारांचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडांना पत्र
मुंबई : केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.
शरद पवार यांनी हे पत्रं ट्विटही केलं आहे. या पत्रातून पवारांनी सदानंद गौडा यांचं देशातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.
दरवाढीचा हा निर्णय धक्कादायक आहे. त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. तुम्ही यात वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर ही दरवाढ मागे घेतल्यास मला आनंदच होईल, असं सांगतानाच कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा द्याल अशी आशा आहे, असंही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
The second wave of #COVID19 Pandemic has impacted heavily on our people, devastating their every means of livelihood. The farming community is reeling under one of the worst ever crisis and their issues need to be addressed immediately.@DVSadanandGowda @PMOIndia pic.twitter.com/IHw0pBhpIJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.