पुणे : ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकताच पद्मश्री पुरस्काराने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं. ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. महानुभाव पंथातील असल्याने त्यांच्यावर ठोसर पागा येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.
त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.“मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती..
हजारो अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होय. १९९४ साली त्यांनी पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात एक संस्था उभारली. आपल्या पोटच्या मुलीसह त्यांनी इतर अनाथ बेवारस मुलांना आधार दिले. या संस्थेकडून शिक्षणासह, भोजन, कपडे आणि अन्य सुविधाही देण्यात येतात. मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे यासाठी प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार शोधून देऊन विवाहदेखील करण्यात येतो. त्यांच्या संस्थेत आतापर्यंत १०५० मुलांनी आश्रय घेतला आहे.
अवघा महाराष्ट्र पोरका झाला !
अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहे. १९९४ मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी एक संस्था स्थापन केली. ममता बाल सदन असं या संस्थेला नाव देण्यात आलं होतं. चिमुकल्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या उच्च भविष्याची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक वर्ष अविरतपणे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांना त्यांनी लहानाचं मोठं केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनाथ बालकांची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर सक्षपणे पेलली. संपूर्ण जगभरात सिंधूताईंच्या कामाची दखल घेण्यात आली असून अनेक मुलाखतींमधून त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं काम याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आधारीत एक मराठी सिनेमाही प्रकाशित झाला होता. तेजस्विनी पंडीत यांनी या सिनेमात सिंधूताईंची भूमिका वढवली होती. सिंधूताईंनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले. अत्यंत खडतर प्रवास केला. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. जन्मापासूनच सिंधुताई यांचा खडतर प्रवास सुरु झाला होता. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. घराला वंशाचा दिवा हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं. मात्र त्यानंतर त्यांचा व्यासंग इतका होता, की सुरेश भटांच्या अनेक गझला त्यांना तोंडपाठ होत्या. अनेक कविताही त्यांना पाठ होता. वयाच्या ९ व्या वर्षी सिंधूताईंचं लग्न झालं होतं. आपल्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचं लग्न झालं होतं. श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे.