ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय उलथापाल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तृणमूल, काँग्रेस, भाजपा या तिन्ही पक्षांना महिन्याभरात प्रचार सभा, रॅली, भव्य सभा आयोजित करत निवडणुकीला नवे रंग चढवले आहे. यातच भाजपाच्या कोअर कमिटीचे मुख्य सदस्य आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ८३ व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी भाजपामध्ये अनेक वर्षे काम केले. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राजकारणापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. यातच आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पश्चिम बंगालमधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.
भाजपामध्ये असताना पक्षांतर्गत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे २०१८ मध्ये यशवंत सिन्हा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा अजूनही भाजपामध्ये कार्यरत आहे. भाजपा सरकारमधील पंतप्रधान मोदींच्या पहिल्या टर्मला ते हवाई वाहतूक राज्यमंत्री राहिले.दरम्यान आता पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये खडाजंगी सुरु झाली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल निवडणुक जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र आता सिन्हा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक असताना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंद्र अधिकारी यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपामध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. परंतु यशवंत सिन्हा यांच्या प्रवेशामुळे आता तृणमूल किती फायदा होईल यासंदर्भात राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे. मूळ बिहारचे असलेले यशवंत सिन्हा यांनी १९६० साली भारतीय प्रशासकीय सेवेत काम केले. आपल्या २४ वर्षीय राजकीय कार्यकिर्दीत त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारतील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.