‘विज्ञानातील संकल्पना’ ऑनलाईन शिकणे विद्यार्थ्यांसाठी कठीण: ब्रेनली
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक प्रक्रिया सुरु असून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या प्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय ‘विज्ञानातील संकल्पना’ समजणे कठीण जात असल्याचे ब्रेनली या ऑनलाईन लर्निंग मंचाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२१ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना विज्ञानासंबंधी कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आपण विज्ञान प्रयोगशाळेच्या प्रत्यक्ष अनुभवाला ही मुकत असल्याचे नमूद केले.
देशभरातील ३६९३ विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणात सुमारे ५१ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना ऑनलाईन शिक्षण पद्धतीत समजणे कठीण जात असून शिक्षकांच्या प्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय या संकल्पनाचा अर्थ समजून घेणे अवघड जात असल्याचे मत नोंदवले. तर ७१.४ टक्के विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळेची आठवण येत असून आपण प्रत्यक्ष अनुभव आणि विविध प्रयोग यांना मिस करीत असल्याचे सांगितले. विज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आदी विषयही ऑनलाईन समजणे काहीसे कठीण वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.
विज्ञान विषय समजून सांगण्यात शिक्षकांचा वाटा महत्वाचा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीत विविध ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे हा विषय समजून घेण्यात मदत झाल्याचे ३६.४ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर २१.५ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे साहाय्य यात लाभल्याचे सांगितले. दरम्यान भारतात विज्ञानाविषयीची आवड विद्यार्थ्यांमध्ये वाढत असून सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला या विषयात करिअर करायला आवडेल असे सांगितले. तर २५ टक्के विद्यार्थ्यानी आपण इतर विषयात करिअर करण्यात अधिक लक्ष देऊ असे सांगितले.
ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी म्हणाले, “ ब्रेनलीमध्ये आम्हाला वाटते की, भविष्यातील शिक्षणपद्धतीत ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि पारंपरिक शाळा या दोहोंचा मिलाप असेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रगतीचे मार्ग असून विशेषत: तंत्रज्ञानाने आयुष्यातील सर्वच क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. विद्यार्थी या नव्या गरजा समजून घेत आहेत, तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत ही खरोखर उत्तम बाब आहे.”