Top Newsआरोग्यशिक्षण

मुंबईत पहिली ते सातवीपर्यंतची शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

पुण्यातही शाळांची घंटा १५ डिसेंबरला वाजणार

मुंबई :राज्य सरकारने उद्या म्हणजेच १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, मुंबई महापालिकेने १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. यानंतर मुंबई महापालिकेने १५ दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आयुक्तांच्या परवागीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा १ डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील शाळेसंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, ओमायक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. सध्या चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, १ डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.

जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना

राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यातही शाळांची घंटा १५ डिसेंबरला वाजणार

मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button