Top Newsराजकारण

संजय राऊत यांचा मलिक यांना पाठिंबा, तर भाजपवर जोरदार निशाणा

शिवसेना कोणालाही अंगावर घेण्यास तयार; कंगनाचा पुरस्कार मागं घ्या : संजय राऊत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत. सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता मुख्यमंत्र्यांनी मलिकांचे कौतुक केले असून, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावे. मात्र, २०२४ नंतर परिस्थिती बदलणार असून, हेच शस्त्र तुमच्यावर उलटणार आहे. राज्यात काय सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. २०२४ मध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. नवाब मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंब दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे, त्यामुळे या लढाईत मलिक एकटे नाहीत. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी

कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून, कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये

जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. काल मुंबईत बोलताना महाविकास आघाडी सरकार उलथलून लावण्याची भाषा जे पी नड्डा यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर राऊत यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात आमच्या नादी लागू नका, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल, असं राऊत म्हणाले.

काँग्रेसमधील जुन्या नेत्यांकडून पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी नुकताच अयोध्येबाबत एक पुस्तक प्रकाशित केलंय. त्यामध्ये हिंदुत्व हे आयएसआय आणि बोको हराम या संघटनेप्रमाणे आहे असं वादग्रस्त लिखाण करण्यात आलंय. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता सलमान खुर्शीद हे देखील पुरुषी कंगणा राणावत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच काँग्रेसमधील जुनेजाणते राहुल गांधी आणि पक्षाला अडचणीत आणतायत, असंही राऊत म्हणालेत. दरम्यान सलमान खुर्शीद यांच्या या पुस्तकातल्या वादग्रस्त लिखाणाबाबत काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनीही ही तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे.

जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात, तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल !

ईडी, सीबीआयच्या कारवायांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे तलवार चालवतात ते तलवारीच्याच घावाने मरत असतात. तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल. तेव्हा हे शस्त्र तुमच्यावरच उलटलेलं असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. आम्ही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते आणि नातेवाईकांना त्रास देण्याचं काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठी उभा आहे. नीचपणाचा कळस आणि कपट काही राजकीय पक्ष करत आहेत. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तुमच्या घरचे नोकर आहेत अशा प्रकारे काम करत आहेत. आम्ही घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्याकडे येऊन गेले. परत या आम्ही स्वागताला तयार आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. २०२४ नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. हे शस्त्रं तुमच्यावर उलटेल हे तुम्हाला सांगतो. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. कितीही कपट कारस्थान करताय ते करा. पण तपास यंत्रणांनी त्यांचे मोहरे बनू नये, असा इशारा राऊत यांनी दिला.

अमृत महोत्सव साजरा करण्याचा भाजपला अधिकार नाही

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. मात्र कंगनाच्या या विधानानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला राहिलेला नाही. जर त्यांनी कंगना बेनला दिलेले पुरस्कार परत घेत नाही तोपर्यंत भाजपला अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. त्या कंगनाबेनला तरी काय लाजलज्जा. तिने माफी तरी मागावी, ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावरून हा सोहळा झाला. तिथे लोकांनी टाळ्या वाजवल्या. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button