पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असून, त्याबाबतची रणनीती आखण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल गोव्यात आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही. उलट, मला कोणी खुर्ची देते का खुर्ची अशी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झाली आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे. कारण ते सकाळी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे बोलायची उत्तम भूमिका करू शकतात. मनोहर पर्रिकर आजारी असताना त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडले होते, तेव्हा याच संजय राऊतांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्यातले सरकार आजारी आहे, सरकार चालवणे अयोग्य आहे, असे सांगितले होते. आता तेच संजय राऊतांचे मगरीचे अश्रू वाहत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना टोला लगावला आहे.
नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचे त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत. नाटकात कोणी घर देता का घर असे एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खुर्ची देते का खुर्ची अशी अवस्था आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही सोंगाडे नक्कीच नाही
नटसम्राट म्हणाल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. गोव्याने मराठी रंगभूमी संपन्न केली. नटसम्राट म्हणाल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले.
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी
तेव्हा पर्रिकर सक्रीय नव्हते. याचा अर्थ त्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना व्हावी अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्दयी नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना गोव्यात कुठे आणि किती जागांवर लढणार?
गोव्यातील आजची स्थिती पाहता, गोवा त्रिशंकूकडे जात आहे. मात्र, राष्ट्रवादीसोबत आम्ही काही जागा नक्की जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचे स्थान असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने खास रणनिती तयार केली आहे. राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने काही महत्त्वाच्या परिसरातील जागांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जागा घेताना महाराष्ट्राच्या लगतच्या मतदारसंघातील जागाच घेतल्या आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
म्हापसा, वाळपई, मये, पराये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे उमदेवार उभे राहतील. मुंबईतील कार्यकर्ते आणि गोव्यातील कार्यकर्ते काम करणार आहेत. आमच्यात मतदारसंघावरून वाद नाही, असे सांगत गोव्यातील चित्र धूसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष देशातील त्याने गोव्याची प्रयोग शाळा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. तृणमूलचे प्रमुख बसले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीसांचा तंबू इथे पडला आहे. काँग्रेस आहे. शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक निकालाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजप पहिल्या क्रमांकावर असून, नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचे स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे, असे ते म्हणाले.