नवी दिल्ली – पच्छिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या गतीमान हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते. संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पेगाससच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यानंतर, याच मुद्द्यावर सातत्याने विरोधी पक्ष एकत्र येऊन बैठका घेत आहेत. आज, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये, शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी, राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.
ससंदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, पेगासस फोन टॅपिंगसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर चर्चा कऱण्यासाठी राहुल गांधी यांनी आज विरोधी पक्षांमधील विविध नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील विविध विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. संजय राऊत यांचा या बैठकीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी मोदी आम्हाला पाणीही विचारत नाहीत, असे म्हटलंय.
जर पंतप्रधानांनी चाय पे चर्चासाठी बोलावलं तर अवश्य जाऊ. पण पंतप्रधानांनी आम्हाला बोलवायला हवं. आम्हाला तर कुणी पाणीदेखील विचारत नाही, ते तर सर्वांचे पंतप्रधान आहेत, असे राऊत या व्हिडिओत बोलताना दिसतात.
विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत सहभागी झालेल्या संजय राऊत यांना या बैठकीत पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आले होते. तसेच राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात यावेळी काही काळ अनौपचारिक चर्चाही झाली. तसेच या संवादाचा फोटो काँग्रेसकडून सोशल मीडियावर विशेष करून शेअर करण्यात आल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री आता अधिक दृढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, पेगॅसस फोन टॅपिंगप्रकरणी सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यावरुन गेले दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज होउ शकले नाही. केंद्र सरकारने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे पुढील रणनिती काय असावी, याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. याशिवाय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी संसदेबाहेर समांतर अधिवेशन घेण्याची योजना असल्याचे सुत्रांनी सांगितले. पेगॅसस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या हताळणीचे मुद्दे समांतर अधिवेशनाद्वारे जनतेसमोर मांडण्याची विरोधकांची योजना आहे.