मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काहीच नव्हतं. राज्याचं हित दिसलं नाही, अशी टीका भाजपकडून केली गेल्यानंतर त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काहीच नव्हतं मग तुम्ही का बोलताय? तुम्ही प्रतिक्रिया का देताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, बांबू लागला म्हणून मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर तुम्हाला खुलासा द्यावा लागतोय ना?, असं संजय राऊत म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर जोरदार टीका केली होती. अयोध्या आणि राम मंदिराच्या बाता करणाऱ्या शिवसेनेला राज्यात अद्याप औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण का करता आलेलं नाही? उत्तर प्रदेशात योगींनी अलाहबादचं प्रयागराज नामांतर करुन दाखवलं, मोदींनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचा विषय मार्गी लावला, तुम्ही हिंदुत्ववादाच्या भाषा करता मग तुम्ही काय केलं?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले की, द्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायच काही नव्हतं. मग तुम्ही एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन लोकांचा वेळ का खाताय? तुम्हाला दखल घ्यावी लागली. तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला सगळं काही लागल्यामुळे तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या भाषणासंदर्भात प्रत्येक शब्दावर खुलासा द्यावा लागत आहे. याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे अत्यंत सुपरहीट, खणखणीत आणि सणसणीत झालं आहे. त्यामुळे आपण सगळे अस्वस्थ आहात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला दिलं आहे.
फडणवीसही पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? हिंदुत्ववादी म्हणून आपण पाच वर्ष मुख्यमंत्री होतात ना? मग तेव्हा नामांतर का झालं नाही? एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षांपासून सरकार केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. पण केंद्रानं परवानगी का दिली नाही हेही विचारावं लागेल. योगींनी जसं प्रयागराज करुन घेतलं तसंच फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही?, असा सवाल राऊत यांनी केला.
राम मंदिराचा प्रश्न मोदींनी नाही, तर कोर्टाने सोडवला !
राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला आहे. त्यानंतर तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी खासदार करण्यात आले, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला. राम मंदिराचा प्रश्न काही मोदींनी सोडवला नाही. मोदींनी करून नाही दाखवलं. ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं. त्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळ मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं, असं राऊत म्हणाले.