मुंबई : चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना लावण्यात आलेला दंड माफ करण्याच्या मुद्द्यासह अन्य मुद्द्यांवर सरकार बरखास्त करण्याची मागणी चंद्रकांत दादा यांनी राज्यपालांकडे केली. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी आज भाजपवर खोचक टीका केली. गोंधळाचं वातावरण या देशात तयार केलं आहे. विरोधी पक्ष रोज राजभवनात जातो, रोज सरकार बरखास्तीची मागणी करतो. राज्यपालांची वेळ घ्यायची. या ना त्या कारणाने सरकार बरखास्त करायचं, अशी मागणी करायची, याशिवाय दुसरं काहीही काम त्यांच्याकडे नाही. आता पाकिस्तानातून महाराष्ट्रात धुळीचा लोट आला आहे. सगळीकडे प्रदुषण पाहायला मिळतंय. आता उद्या भाजपचे लोक राज्यपालांकडे जातील आणि म्हणतील सरकार बरखास्त करा, असा जोरदार टोला राऊत यांनी भाजपला लगावलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्त आज पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना खा. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली एक आदर्श सरकार देण्याचं काम शिवसेनेनं केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सारखे मेरीट लिस्टमध्ये येत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज फक्त शिवसेना या सरकारचं नेतृत्व करतेय म्हणून केंद्राची हिंमत नाही. शिवसेना जर या सरकारचं नेतृत्त्व करत नसती, तर हे सरकार टिकलं असतं का, केंद्रानं ते टिकू दिलं असतं का, अशी शंका माझ्या मनात येतेय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाळासाहेबांना अभिवादन केलं, हे तुम्हाला पचलं नाही, म्हणूनही तुम्ही सरकार बरखास्तीची मागणी कराल.
दिल्लीत नेताजींचा पुतळा उभा करत आहात. आम्हीही नेताजींची महती रोज गातो. पण दररोज जो इतिहास बदलण्याचं काम केलं जातंय, की गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही, हे म्हणणं चुकीचंय. बाळासाहेबांचा दिल्लीत पुतळा उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे, असंही राऊत यावेळी म्हणाले.
आज बाळसाहेब असते तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधानांना पंजाबमधून परत जावं लागलं नसतं, असा खोचक टोला राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय. संजय राऊत म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर ९६ वर्षाचे असते. बाळासाहेबांनी तरुणांचे नेतृत्व केलं. आज महाराष्ट्रात आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला भेटण्यासाठी येणारा, शिवसेनेबाबत आस्थेने विचारणारा वर्ग तरुण आहे आणि हिच शिवसेनेची मिळकत आहे. बाळासाहेबांनी काय केलं? हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढं नेलं. बाळासाहेब नसते तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला, हिंदुस्तान हिंदुस्तान राहिला. बाळासाहेबांच्या काळात पंतप्रधान कुणी असता तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधान परत नसते गेले, अशी जोरदार टोलेबाजी राऊतांनी केलीय.
कवितेच्या माध्यमातून मोदींवर जोरदार निशाणा
तसंच शेतकऱ्यांची भीती वाटावी असं वातावरण कुणी निर्माण केलं? सवाल उपस्थित करत, एका कवितेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोदींवर हल्ला चढवला.
ना कोई जंग लढी है मैंने
ना खाना पिना छोडा है मैंने
बस अपनेही देश मै जिंदा लोट आया हूँ मैं
अपनेही लोगोंसे डरता हूँ मैं
काम ही ऐसा करता हूँ मैं
सारे देश को बेचकर जिंदा लौट आया हूँ मैं…