सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात…; संजय राऊतांचा टोला
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत बोलताना तीन महिन्यांनंतर राज्यात सत्ताबदल होण्याचे संकेत दिले. मुनगंटीवार यांच्या विधानानं विधिमंडळात उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आता मुनगंटीवारांच्या विधानाला शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा टोला राऊत यांनी लगावला. संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
सरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकार अतिशय मजबूत आहे. सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी पुढील साडे तीन वर्ष त्यांचं काम करत राहावं. सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये, असं राऊत म्हणाले. लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हा महासिनेमा पाच वर्ष चालेल. महाविकास आघाडीचा महासिनेमा असल्यानं त्यात खलनायकही चांगले हवेत, असं म्हणत राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना टोला हाणला. सामनात अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसला, अशी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस सामना वाचतात. सामना वाचणं ही चांगली सवय आहे. त्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, असं राऊत म्हणाले. सरकारमध्ये काँग्रेस नाराज आहे का, असं विचारलं असता, सर्वात आनंदी काँग्रेस पक्षच आहे. हवं तर तुम्ही त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारा, असं उत्तर राऊत यांनी दिलं.
काल विधानसभेत विदर्भाच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकमेकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.
यानंतर मुनगंटीवार यांनी शेर सादर करत देशमुखांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा रंगली. तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, असं मुनगंटीवार का म्हणाले? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत का?, अशी उलटसुलट चर्चा विधानसभेत सुरू झाली.