मोठ्या विकेट लूज बॉलवरच जातात; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला...
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या ठिकाणी मला फटकेबाजी करायला मजा येते, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. स्पिनर बॉलर कधी फास्ट चेंडू टाकत नाही. महाराष्ट्रात फक्त चंद्रशेखर भागवत हे एकटेच गुगली टाकायचे. बाकी गुगली गोलंदाज हे डुप्लिकेट आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकदा हात पोळूनही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचं आश्चर्य वाटतं. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरु दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले.
यावेळी फोन टॅपिंग प्रकरणावरुन संजय राऊत यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते. तरीही महाविकासआघाडीची सत्ता आल्यावर पाच ते सहा महिने त्या पदावर कशा राहिल्या, याचं मला आश्चर्य वाटतं. एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो. शरद पवारही याच मताचे आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर वेळीच कारवाई केली असती तर विरोधी पक्षनेत्यांना दिल्लीत कागद फलकावयची संधी मिळाली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांवर कधीही विसंबू राहू नका, अस्तनीतील निखाऱ्यांना वेळीच दूर करा, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. राज्यात युतीची सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. तसेच महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांवरही नजर ठेवली जात होती. इतकं करुनही भाजपची सत्ता आली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.