Top Newsस्पोर्ट्स

सत्ता नसलेल्या राज्यात राज्यपालांच्या माध्यमातून भाजपच्या कुरघोड्या : संजय राऊत

नवी दिल्ली : ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आढावा बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही टीका केली.

ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते. दिल्लीत सध्या काय चाललं? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या. काही हरकत नाहीत. दम लागून पडाल तुम्ही, असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.

राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पेगासस मुद्द्यावरून धारेवर धरले. आम्हाला खात्री आहे. आम्हा विरोधी पक्षाला जे म्हणायचे आहे. तिच भूमिका सर्व प्रमुख पत्रकार कोर्टात मांडतील. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असा हल्ला त्यांनी चढवला.

फक्त सरकारची चमचेगिरी करावी का?

तुम्ही पेगाससवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, महागाईवर बोलायला तयार नाहीत, मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? तुमची अपेक्षा काय आहे? विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची फक्त चमचेगिरी करावी का? हे चालणार नाही, असा इशारा देतानाच विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून देशाचं काम करावं ही आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर. पेगासस हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यावर बोलणार नाही हे किती काळ चालणार. त्यामुळे कोर्टात न्याय मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असं ते म्हणाले.

लोकशाहीवर हल्ले करणारे संपले

आम्ही सांगू तेच करा आणि आम्ही सांगू तेच बोला. आम्ही सांगू तिच लोकशाही ही सरकारची भूमिका आहे. हा १२५ कोटी लोकांचा देश आहे. या देशाने स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी अनेक लढाया लढल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून नंतर संपले आहेत. हा या देशाचा इतिहास आहे. सरकार कोणत्याच विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही, असा आरोपही त्यांनी केला.

म्हणून बलात्कार माफ करायचे का?

काल दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. विरोधी पक्षाचे नेते त्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटाला गेले हे सुद्धा सरकारला आवडलेलं नाही. तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया पाहा. भारतीय जनता पक्षातर्फे उलट प्रश्न करण्यात आला. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? असं भाजपवाले म्हणत आहेत. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होतात म्हणून तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का?, असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button