मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीवर टाकलेल्या छाप्यानं चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे सध्या वादात सापडले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांच्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. आता, याप्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी, एनसीबीचे अधिकारी दिल्लीतून मुंबईत येणार आहेत.
प्रभाकर साईल यांच्या आरोपानंतर याप्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.
एनसीबीच्या महासंचालकांनी आढावा बैठकीसाठी वानखेडेंना दिल्लीत बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईला येणार असल्याचे समजते. उद्याच २६ ऑक्टोबर रोजी वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. या पथकात ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह २ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. दरम्यान, वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
किरण गोसावी यानं एनसीबीच्या कार्यालयाजवळच सॅम डिसोजा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली होती आणि त्यांच्या व्यवहारासंबंधी बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे. एनसीबीच्या या कारवाईचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांच्या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर प्रभाकर साईल आज एनसीबी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबईतील गुन्हे शाखेत पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं प्रभाकर साईल यांचं म्हणणं आहे.