मुबई : क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी.गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होतं. प्रभाकर साईल यांच्या २५ कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. मात्र, २५ कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर हजर व्हावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलंय. तर, के.पी.गोसावी यानं देखील एनसीबी समोर येऊन बाजू मांडावी, असंही सिंह म्हणाले.
प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर आज पाच सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली. आम्ही इथल्या युनिटला विनंती केली होती की, जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांना नोटीस पाठवली जावी त्यांनी मीडियात जे काही तथ्य सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले. मी मीडियाच्या माध्यमातून के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी.
आम्ही आज समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेतली जाईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं. गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावे. आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळा होता. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जातोय. त्यामुळे त्यांना नोटीस पोहोचली नाही. त्यांनी उद्या-परवा या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन आपली बाजू मांडावी, असं ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.
एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराला चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, असं देखील ते म्हणाले.
वानखेडेंची तपास अधिकारी म्हणून उचलबांगडी होणार?
समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती एनसीबीचे उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. तसंच वानखेडे यांना या प्रकरणातील तपासापासून दूर केलं जाणार का? या प्रश्नावरही सिंह यांनी उत्तर दिलं आहे. सिंह म्हणाले की, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की या प्रकरणाचा तपास पुढे जाऊद्या. यात काही ठोस पुरावा किंवा साक्ष मिळेल तेव्हाच मी डीजींना रिपोर्ट देऊ शकेन, असं सिंह म्हणाले.