मनोरंजन

स्टार प्रवाहकडून महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचं चातुर्य आणि साहसाची गोष्ट सांगणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे. पोलिसांच्या कार्याला समर्पित असणाऱ्या या मालिकेच्या निमित्ताने ठाणे तलावपाली परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा देण्यात आला. याप्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, खासदार राजन विचारे, स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे, निर्माते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि नवे लक्ष्य मालिकेची सर्व कलाकार मंडळी हजर होते. ठाणेकरांसाठी तलावपाली म्हणजे फिरण्याचं आवडतं ठिकाण. नवे लक्ष्य मालिकेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षण विद्युत रोषणाईचा झगमगाट ठाणेकरांनी नुकताच अनुभवला. नौकाविहार करताना मालिकेची झलक पाहाण्याचा सुखद अनुभव देखिल प्रेक्षकांना घेता आला.

महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे.

‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.’

स्टार प्रवाह प्रस्तुत नवे लक्ष्य या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य नव्या रुपामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे याचा आनंद आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी. तेव्हा पाहायला विसरु नका नवे लक्ष्य दर रविवारी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button