राजकारण

पूरपरिस्थिती पाहून दु:ख, केंद्राकडून नक्की मदत केली जाईल : राज्यपाल

चिपळूण (रत्नागिरी) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाचा त्यांनी दौरा केला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोश्यारी यांनी पाहणी केली. यावेळी कोकणातील चित्र विदारक असल्याचं सांगत या परिस्थितीत कोणतंही राजकारण केलं जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आज राज्यपालांनीही चिपळूणचा दौरा केला. त्यांच्यासोबत या दौऱ्यात भाजप नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज चिपळूणमध्ये पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी दोन ठिकाणी आपला ताफा थांबवून नागरिकांशी चर्चा केली. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी आधार दिला. चिपळूणमधील पूरग्रस्तांना केंद्र शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल. कोणतंही राजकारण केले जाणार नाही तसेच येथील परिस्थिती पाहून मला दुःख होतंय, असं ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे. कोकणाला आता मदतीच्या हातांची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button