पुणे : काही दिवसांपूर्वीच नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्यावरून आता राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी अमृता फडणवीसांच्या टीकेचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला आहे. अमृता फडणवीसांनी आपल्या ट्विटमधून शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं, त्यावर बोलताना, २०१४ ला भाजप जशी सत्तेत आली तशी नेत्यांची वृत्ती नीच होत गेली, तशीच अमृता वहिनी यांची वृत्ती नीच आहे तसंच त्या वागतायेत, असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे. तर त्यांना भाजप आ. श्वेता महाले यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले आहे.
अमृता फडणवीस नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. कधी त्या ट्विटरवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करतात, तर कधी दुसऱ्या कुठल्या नेत्यांवर. महाविकास आघाडीतील महिला नेत्या आणि अमृता फडणवीसांचे ट्विटरवॉर अनेकदा पाहायला मिळाले आहेत. आता त्या वादाचा नवा एपिसोड सुरू झाला आहे. त्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवं, असा सल्लाही रुपाली पाटलांनी दिला आहे. तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे की अमृता फडणवीस यांच राजकारण नीच आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.
श्वेता महाले यांचे प्रत्युत्तर
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी रुपाली पाटील-ठोंबरे यांना जोरदार चपराक दिलीये. भाजप आमदार श्वेता महाले बोलताना म्हणाल्या, परवा राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपाली-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांची वैचारिक पातळी काय आहे हे दिसून येते. रुपाली पाटील स्वतः महिला आहेत आणि एका महिलेबद्दल असे बोलतात आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवतात म्हणत रूपाली पाटील-ठोंबरे यांना टोला लगावला, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला अवरण्यापेक्षा पेक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांच्याच पक्षातील मंत्री धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांना आवरलं तर बरं होईल अशी खोचक प्रतिक्रिया दिली. एक महिलाच दुसऱ्या महिलेवर अशी टीका करते याची खंत वाटते असेही त्या म्हणाल्या.