Top Newsराजकारण

‘मुका’ प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांची दरेकरांविरोधात तक्रार

पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात कलम ५०१ नुसार तक्रार दाखल केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं म्हटलं होतं. त्यावरुनच महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तक्रार केली.

प्रवीण दरेकर यांनी इतक्या दिवसात महिलांची माफी मागितली नाही, त्यांनी महिलांना लज्जा होईल असं वक्तव्य केलं. उर्मटपणाची प्रतिक्रिया दिली, त्यामुळे मी स्वत: पोलिसात तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरेकर काय म्हणाले होते?

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांच्या बोलण्याला राष्ट्रवादीत सुरु असलेल्या लोककलावंतांच्या पक्षप्रवेशची पार्श्वभूमी होती.

चाकणकरांचा हल्लाबोल

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button