Top Newsमहिलाराजकारण

आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील : रुपाली चाकणकर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाकणकर यांनी आज आपला पदभार स्विकारला, त्यावेळी राज्यातील सर्वच घटकांत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी हा आपला आयोग वाटावा, यासाठी मी कार्यरत राहीन, असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आहे.

खासदार शरद पवार, उपमुख्यमंञी अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, अन्न पुरवठा मंञी छगन भुजबळ, महाविकास आघाडीतील सर्व मंत्री आणि इतर सर्व सन्माननीय नेते यांचे मी मनापासून आभार मानते, या सर्वांनी राज्य महिला आयोगावर काम करण्याची मला संधी दिल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय. तसेच, आज देशामध्ये महाराष्ट्र हे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय प्रगत असे राज्य आहे त्यामुळे आपल्या महिलांसाठी काम करताना हे अतिशय जबाबदारीचे व आव्हानात्मक असे पद आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काम करताना कर्तव्यपूर्वक आणि प्रभावीपणे मी निश्चितच काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील महिलांना महिला आयोगाच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मला आपल्या सर्वांचेच सहकार्य लागेल आणि ते सहकार्य आपण कराल याची खात्री मला आहे. पहिल्याच दिवशी आश्वासनांची स्वप्न दाखवणार नाही कामाच्या माध्यमातून या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देईल आणि ‘महिला आयोग’ हा महाराष्ट्रातील सर्व वर्गातील सर्व स्त्रियांसाठी ‘आपला आयोग’ वाटावा यासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्यरत राहील, असेही त्यांनी म्हटले.

चित्रा वाघ यांच्याकडून अभिनंदन

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनंदन केलं आहे. “रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. पहिल्यांदा रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको, अशी भूमिका घेत चाकणकरांवर आसूड ओढणाऱ्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची निवड होताच मैत्रीला जागत त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण ज्यावेळी चाकणकरांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, त्यावेळी रावणाला मदत करणारी शूर्पणखा अध्यक्षपदी नको, अशी भूमिका घेत चाकणकरांच्या निवडीला चित्रा वाघ यांनी विरोध केला होता. मात्र काल रात्री (बुधवारी) चाकणकरांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाली. राजकारण्यांनी अभिनंदनाचे ट्विट करायला सुरुवात केली. ज्यानंतर चित्रा वाघ यांच्या ट्विटकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु अपेक्षेप्रमाणे चित्रा वाघ यांनी चाकणकरांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे. पण हे ट्विट करताना त्यांनी भाजपच्या लढ्याला यश आलं असं म्हणताना राज्य सरकारला सल्लाही दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button