रुपाली चाकणकरांनी नवनीत राणांना चांगलेच सुनावले!
राष्ट्रवादीच्या जीवावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद सोमवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरून शिवसेना-भाजपचे खासदार एकमेकांना भिडले. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांच्या याच मागणीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. “नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना दिलं.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत खासदार नवनीत राणा यांचा जोरदार समाचार घेतला आहे. त्यांच्या मागणीवर फुली मारत त्यांना त्यांची खासदारकी राष्ट्रवादीमुळे मिळाल्याची आठवण करुन दिली आहे. ‘नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.’
जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेने वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव आणला होता, असं सांगतानाच हा प्रकार असाच सुरू राहिला तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल, असं राणा म्हणाल्या होत्या.