फोकसराजकारण

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरेला ठाणे महापालिकेकडून हक्काचे घर

ठाणे : रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे ( वय १४) हिला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर देऊन शिवसेनेने शब्दपूर्ती केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते तिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुणालीकडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी पालकमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button