राजकारण

पूरग्रस्तांच्या खात्यात उद्यापासून १० हजार रुपये जमा होणार : वडेट्टीवार

नागपूर: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. यातच आता सरकारने या नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्यापासून १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच त्यांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. याशिवाय, पावसामुळे ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले. काही ठिकाणी तर ४०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनाच्या परिसरात ४८ तासात १०७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि १७ टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल, असंही ते म्हणाले.

यावेळी विजय वड्डेटीवार यांनी केंद्राकडून मिळालेल्या मदतीवरही भाष्य केलं. केंद्र सरकारने ७०० कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षी आलेल्या ऑक्टोबरच्या पुराचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बघा पूर आला आणि पैसे दिले, असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे. आम्ही ३७२१ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले ७०० कोटी मिळाले. तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत मिळाली नाही. या सर्व संकटात ४२० आणि ७२१ कोटी राज्याला मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत ११४१ कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button