सचिन वाझेचा खेळ खल्लास; रियाझ काझी होणार माफीचा साक्षीदार?
मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे API सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील (CIU) अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन वाझे यांना ताब्यात घेतल्यावर NIA ने लगेच रियाझ काझी यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. त्यांनी सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवण्यात आले. या तिन्ही दिवशी त्यांची जवळपास 10 तास चौकशी झाली होती. मात्र, गुरुवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. आतापर्यंतच्या चौकशीत रियाझ काझी यांनी आपला जबाब नोंदवला आहे. यामध्ये सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून केलेल्या गोष्टींची कबुली रियाझ काझी यांनी दिली आहे. हा सगळा घटनाक्रमक पाहता याप्रकरणात रियाझ काझी माफीचे साक्षीदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होती. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्या होत्या. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीची सीसीटीव्ही फुटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती आहे. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांचा कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.
वाझेंची हत्या होऊ शकते : राणा
सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Vaze) यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.