दुबई : : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय प्राप्त केला. धोनी ब्रिगेडनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आजच्या विजयसह गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. दोन तुल्यबळ संघांमध्ये अटीतटीचा सामना अपेक्षित होता, मात्र मॅच अगदी एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे होती. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज अशी नाबाद ८८ धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत सामन्यात मुंबइ इंडियन्ससमोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सच्या संघाला २० षटकांच्या अखेरीस ८ बाद १३६ धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून ड्वेन ब्रावो यानं सर्वाधिक ३ बळी घेतले. तर दिपक चाहरनं दोन जणांना बाद केलं. जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एका खेळाडूला तंबूत धाडलं.
मुंबई इंडियन्सकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी साकारली. पण संघाला विजय प्राप्त करुन देण्यात तो अपयशी ठरला. तिवारी वगळता इतर कोणताही खेळाडू आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याची अनुपस्थितीचा संघाला मोठा फटका बसल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे.
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून ऋतूराज गायकवाड यानं एकहाती फलंदाजी करत संघाला १५० धावांची वेस ओलांडून दिली होती. संघाचे पहिले तीन फलंदाज खातंही न उघडता तंबूत दाखल झालेले असताना ऋतूराजनं मैदानात जम बसवून संघाच्या धावसंख्येला आकार दिला आणि अखेरच्या षटकापर्यंत फलंदाजी केली. अखेरच्या पाच षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत ऋतूराजनं आपला फॉर्म कायम राखला आहे.
सामन्याची नाणेफेक जिंकून चेन्नईनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ट्रेंट बोल्टनं पहिल्या षटकात फॉर्मात असलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस याला माघारी धाडत खणखणीत सुरुवात करुन दिली. त्यानंतर अॅडम मिलने यानं मोइन अली याला झेलबाद करुन मुंबईला दुसरं यश मिळवून दिलं. चेन्नईच्या संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसलेले असताना अंबाती रायुडू मिलनेच्या बाऊन्सवर दुखापतग्रस्त झाला आणि पव्हेलियनमध्ये दाखल झाला. त्यामुळे चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिस, मोइन अली आणि रायुडू यांना खातंही उघडता आलं नाही. संघावर दबाव निर्माण न होऊ देण्यासाठी सुरेश रैना (४) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. बोल्टनं रैनाला माघारी धाडलं.
महेंद्रसिंग धोनीवर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आली. सामन्याच्या चौथ्याच षटकात धोनीवर फलंदाजीची वेळ आली. धोनीनं सावध सुरूवात केली होती. पण अॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर तोही झेल देऊन बसला. बोल्डनं धोनीचा जबरदस्त झेल टिपला. चेन्नईच्या संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. याही परिस्थितीत ऋतूराज गायकवाड आपली विकेट सांभाळून ठेवत संयमानं खेळत होता. अखेरच्या पाच षटकांमध्ये ऋतूराजनं आक्रमक खेळीला सुरुवात करत संघाला बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर आणलं. ड्वेन ब्रावोनंही चांगली साथ देत ८ चेंडूत २३ धावांची खेळी साकारली.
मराठमोळा ऋतुराज सामनावीर
चेन्नईच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौैरवण्यात आलं. एकीकडे मुंबईच्या माऱ्यापुढे डुप्लेसी, मोईन अली सारखे दिग्ग शून्यावर बाद होत होते. त्यानंतर धोनी रैनाही ३, ४ धावा करुन तंबूत परतले असताना एकहाती खिंड लढवत ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकार ठोकत नाबाद ८८ धावा ठोकल्या. ज्यामुळे मुंबईला चेन्नई १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य देऊ शकली. त्याच्या या कामगिरीसाठीच त्याला सामनावीरीचा पुरस्कार देण्यात आला आहे.