Top Newsआरोग्यराजकारण

लॉकडाऊन नको असेल तर बंधने पाळणे आवश्यक; ‘ओमीक्रॉन’ संकटावर मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

मुंबई : कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. ‘कुछ नही होता यार’ असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगत मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असा आदेशच अधिकाऱ्यांना दिला.

नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे.

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(यांनी कोविडच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे आदेश दिले आहेत. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष द्या. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधनं पाळावीच लागतील असा सतर्कतेचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेंसह आरोग्य विभागाचे सचिवदेखील उपस्थित होते. ओमीक्रॉनवर चर्चा करण्यासाठी मुखयमंत्र्यांनी सोमवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठकही बोलावली आहे.

घातक व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत.

या बैठकीत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर काही पर्याय ठेवले आहे. जेणेकरून महाराष्ट्रात हा व्हेरिएंट जास्त पसरू नये. ओमीक्रॉन व्हेरिएंट का घातक आहे? याबाबत टास्क फोर्सचे डॉ. शशांत जोशी यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे. डेल्टाची जागा ओमीक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते असं त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button