Top Newsअर्थ-उद्योग

पेट्रोल, डिझेलवर सर्वाधिक कर असल्याची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची कबुली

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. दिल्लीतही पेट्रोलच्या किमतीनी शंभरी ओलांडली आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे जनसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

इंधनदरवाढीवर बोलताना शक्तिकांत दास म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसेच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणायचे असून, यासाठी महागाई नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. सातत्याच्या इंधनदरवाढीमुळे महागाई वाढत चालल्याचेही ते म्हणाले.

दास म्हणाले की, रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर ४ टक्के असणे अपेक्षित आहे. यामुळे गुंतवनुकदारांमधील अनिश्चितता कमी होईल. तसेच विकासाला बळ मिळू शकेल. गेल्या महिन्यात सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी कर्जावर हमी देण्याची घोषणा केली आहे. आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. याचा फायदा होईल, असेही दास यांनी सांगितले. जागतिक स्तरावर कच्च्या तेल्यांच्या वाढत्या किमतीचे थेट परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होत आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा परिणाम भारतासह सर्व अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारताचा परकीय चलन साठा ६०९ अब्ज डॉलर्स आहे, असे दास यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०६.५९ रुपयांवर गेला आहे. दिल्लीत पेट्रोल १००.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.३७ रुपये इतका वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १००.६२ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०८.८८ रुपये इतका वाढला आहे. तर, मुंबईत डिझेलचा भाव ९७.१८ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत ९४.१५ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६५ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.४० रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button