रिलायन्सचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन जिओफोन नेक्स्टचे दिवाळीत लाँचिंग
मुंबई : रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन जिओफोन नेक्स्टचे आज होणारे लाँचिंग रद्द करण्यात आले आहे. कंपनीने गणेश चतुर्थी म्हणजेच आज १० सप्टेंबरला या फोनला लाँच करून धमाका करण्याची योजना बनविली होती. आता हा फोन दिवाळीमध्ये लाँच केला जाणार आहे. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे.
जिओने म्हटले आहे की, जिओफोन नेक्स्टची अॅडव्हान्स ट्रायल सुरु आहे. या फोनचा रोल आऊट दिवाळीच्या दरम्य़ान केला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या वर्षीच्या सुरुवातीला सांगितलेले की, जिओ आणि गुगलद्वारे हा फोन विकसित केला जात आहे. हा फोन 10 सप्टेंबरला उपलब्ध केला जाईल. परंतू आज लाँचिंगच्या दिवशी कंपनीने इच्छुक ग्राहकांना धक्का दिला आहे.
दोन्ही कंपन्यांनी जिओफोन नेक्स्टला आणखी सक्षम बनविण्यासाठी काही युजर्सना तो वापरण्यासाठी दिला आहे. हा टप्पा पार पडला की दिवाळीच्या सुरुवातीला हा फोन लाँच केला जाईल. या अतिरिक्त काळामुळे सेमीकंडक्टरची टंचाई देखील दूर होईल आणि या काळात अधिक सेमिकंडक्टर साठवता येतील असे कंपनीने म्हटले आहे.